नऊ वर्षात मोदी सरकारने घडविला नवा भारत**- खा. सुनील मेंढे यांची पत्रपरिषदेत माहिती*

*नऊ वर्षात मोदी सरकारने घडविला नवा भारत*
*- खा. सुनील मेंढे यांची पत्रपरिषदेत माहिती*

गोंदिया, 30 मे 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला आज 9 वर्ष पूर्ण झाले असून याकाळात देशाने सर्वच क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. गरीब कल्याणापासून ते जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढविणार्‍या अनेक गोष्टी देशातील नागरिकांनी अनुभवल्या आहेत. यशस्वी पहिले पाच वर्ष व त्यानंतर पुन्हा कामाची पावती म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आज देशातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून आले आहे. मागील नऊ वर्षात भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील विकासासोबतच मोदी सरकारने सकारात्मक परिवर्तन घडवून नवा भारत निर्माणाकडे मोठी मजल मारली आहे, अशी माहिती खासदार सुनील मेंढे यांनी दिली. 
ते आज, 30 मे रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी माजी आ. रमेश कुथे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, शहर अध्यक्ष सुनील केलनका आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. मेंढे म्हणाले, नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीने 30 मे ते 30 जून दरम्यान महा जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम राबविले जाणार असून घर घर संपर्क अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांच्या केंद्र सरकारच्या योजना, केलेले काम व निर्णयाची माहिती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेला दिली जाणार आहे. ते पुढे म्हणाले, 2014 ते आजपर्यंत अनेक जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या जीवनात मोठे बदल घडून आले आहे. यात जनधन योजना, उज्वला योजना, शेतकरी सन्मान निधी योजना, पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, स्टार्ट अप इंडिया, जनऔषधी केंद्र योजना, हर घर जल योजना, डीबीटी योजना, एक देश एक शिधापत्रिका, पीक विमा योजना, सुकन्या समृद्धि योजना अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. सोबतच लाखो किलोमीटर महामार्ग व उड्डाणपूल बांधकाम, मेट्रो रेल्वेचे जाळे, वंदेभारत एक्सप्रेस, गतीशक्ती योजना, डिजीटल क्रांती आदी माध्यमातून देशाचा विकास घडला आहे. आज देश पाचव्या क्रमांकाची अर्थसत्ता झाली आहे. जगातील सर्वात युवा देश म्हणून अंत्योदयाच्या मार्गाने सबका साथ, सबका विकासाचा ध्यास घेऊन विकसीत राष्ट्राकडे वाटचाल करीत आहे. कोविड काळात मोदींजींचे कार्य कुणीच विसरु शकणार नाही. मास्क असो किंवा वॅक्सिनची निर्मिती व कोव्हिन अ‍ॅपच्या माध्यमातून प्रत्येकाला मोफत लसीकरण, 80 कोटी जनतेला मोफत रेशन देऊन या संकटातून बाहेर काढले. या काळात लोकसभा सदस्य या नात्याने या सर्व योजनांत मला सहभागी होण्याचे भाग्य लाभले आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात दोन्ही जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय, बिरसी विमानतळावर प्रवासी वाहतुकीची सुविधा, गोंदिया, तुमसर व भंडारा रेल्वे स्थानकाचे 25 कोटी खर्चून अत्याधुनिकीकरणाचे काम, 400 कोटीची गुंतवणूक असलेले मल्टिमॉडेल लॉजस्टिक पोर्ट निर्माण करण्याचे कार्य सुरु असून त्यासाठी लागणारे 100 एकरपेक्षा जास्त जागा पाहणी सुरु आहे. 1646 कोटीचे 288 किमी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले असून उड्डाणपूल व इतर मार्गाचे काम सुरु आहे. 
आज जी 20चे अध्यक्षपद भारताकडे आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. आत्मनिर्भर भारताकडे आपली वाटचाल सुरु असून 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्थेकडे आपण जात आहोत. राम मंदिरचे निर्माण कार्य, 370 कलम हटविणे व नवीन संसद भवनाची निर्मिती हे ऐतिहासिक क्षण असून भारताला परमवैभवाला नेण्यासाठी सज्ज असल्याचे ते म्हणाले.