हत्तीची छेड काढणे तरुणांच्या अंगलट

elephant Kamalapur Camp

गडचिरोली : कमलापूर हत्तीकॅम्पमधील हत्तीण मंगला रस्ता ओलांडत असताना तिच्या जवळ जाऊन छेड काढणे तरुणाच्या अंगलट आले. तरुणाच्या कृत्याने संतापलेल्या मंगलाने थेट त्याच्यावर हल्ला चढवला यात दुचाकीचा चेंदामेंदा झाला, तर तरुण थोडक्यात बचावला.

गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे आहे. आजघडीला या कॅम्पमध्ये ८ हत्ती आहेत. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास येथील हत्तींना मुक्त विहारासाठी लगतच्या जंगलात सोडण्यात येतात. शनिवारी येथील हत्तीण मंगला कमलापूर-दामरंचा मार्गावर असताना काही तरुण तिच्या जवळ जाऊन आवाज व हातवारे करून छेड काढण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी संतापलेल्या मंगलाने त्यांच्यावर हल्ला केला. यात तरुण थोडक्यात बचावले पण त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला.