सासर्‍याने केली सुनेची हत्या*

*सासर्‍याने केली सुनेची हत्या* 
सारस न्यूज एक्सप्रेस 
भंडारा : सुनेच्या चारित्र्यावर संशय घेऊन सासऱ्यानं सूनेची कुऱ्हाडीनं अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील रोहना गावात घडली. प्रणाली सतीश ईश्वरकर (24) असे मृत सुनेचे नाव आहे. सुनेची हत्या करून तिचा मृतदेह घरातील अंगणात कापडाने झाकून ठेवत सासऱ्याने मोहाडी पोलिसात आत्मसमर्पण केलं. 
या धक्कादायक हत्या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी बळवंत ईश्वरकर (57) असे गुन्हा दखल करून अटक केलेल्या आरोपी सासऱ्याचे नाव आहे. 
आरोपी सासरा यांच्या पत्नीचे निधन झाले असून ते मुलगा, सून आणि एका नातवासह रोहना गावातील घरी राहत होते. मात्र, सासरा बळवंत याचा सून प्रणाली हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे घरात सासरा आणि सून यांच्यात वाद होत होता.
         
शुक्रवारी सकाळी मृतक प्रणाली हिचा पती हा शेतात गेला असताना सासऱ्याने सूनेसोबत वाद घातला आणि तो वाद विकोपाला गेला. यातच सासऱ्याने घरातील धारदार कुऱ्हाड आणून घराच्या बाहेर भांडी घासत असलेल्या सूनेवर सपासप वार केला. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रणालीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. थरकाप उडविणाऱ्या या घटनेनंतर सासऱ्याने घरातून कापड आणून सुनेवर झाकलं आणि मोहाडी पोलीस ठाण्यात जावून आत्मसमर्पण केले. घटनेची माहिती मिळताच मोहाडीचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लारवार हे आपल्या पथकासह रोहना गाव गाठत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.