किटकनाशक फोरेट विक्री करण्यावर गुन्हा दाखल

 किटकनाशक फोरेट 
विक्री करण्यावर गुन्हा दाखल
        सारस न्यूज एक्सप्रेस 
         गोंदिया, दि.30 : जिल्ह्यात 9 भरारी पथक स्थापन करण्यात आले असून भरारी पथकामार्फत कृषि केंद्राची अचानक तपासणी करण्याची मोहिम सध्या खरीप हंगामामध्ये सुरु आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील खजरी येथील अधिकृत किटकनाशक विक्रेता मेसर्स चव्हाण कृषि केंद्राची तपासणी भरारी पथकामार्फत करण्यात आली. तपासणी दरम्यान त्यांच्या गोदामामध्ये फोरेट किटकनाशक व्यापारी नाव फोरेट एक्स उत्पादक नाव पेस्टीपॅक क्रॉप केअर या किटकनाशकाचा 829 किलोचा साठा आढळून आला. 
       केंद्र शासनाची अधिसूचना 8 ऑगस्ट 2018 अन्वये फोरेट किटकनाशक हे मानव व पशु प्राण्यांना अत्यंत हानिकारक असून जनसुरक्षेच्या कारणास्तव त्याची विक्री, वितरण व वापर दिनांक 31 डिसेंबर 2020 पासून पुर्णत: प्रतिबंधित केले आहे. असे असून सुध्दा चव्हाण कृषि केंद्राचे संचालक ताजराज चव्हाण, खजरी यांनी सदर किटकनाशक विक्री करण्याचे उद्देशाने गोदामात ठेवले होते. सदर 829 किलो किटकनाशक एकूण 1 लाख 40 हजार 970 रुपये किंमतीचा साठा जप्त करुन पोलीस स्टेशन डुग्गीपार ता.सडक/अर्जुनी येथे चव्हाण कृषि केंद्राचे संचालक ताजराज चव्हाण यांनी जाणिवपूर्वक प्रतिबंधीत किटकनाशकाची साठवणूक, वितरण व विक्री केल्या प्रकरणी भा.द.वि. कलम 420, किटकनाशके कायदा 1968 चे कलम 3k(v), 3k(vii), 13(1), 13(2), 17(1)(b),(c),(d), 18(1) (b),(c), 27(1), 29, किटकनाशक नियम 1971 नियम क्र.9(3) (vi), (vii), 10(1A), 10 A(a)(b), 10(4A)(i), 10(4)(ii), (iii), 10-D, 15(2), 16, 18(1), 18(1)(c), 19(7), 19(8) व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 8 अन्वये एफ.आय.आर. क्रमांक 0244 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       सदर कार्यवाहीची राजेंद्र साबळे, विभागीय कृषि सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यसलव बावनकर यांच्या फिर्यादीवरुन करण्यात आली. सदर कार्यवाहीमध्ये तालुका कृषि अधिकारी के.के.बडोले, कृषि अधिकारी डी.के.रामटेके यांनी शासकीय पंच म्हणून उपस्थित राहून कार्यवाहीस सहकार्य केले.
      सारस पक्षी  संवर्धनासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात आले असून सारस पक्ष्याला हानिकारक असल्याने थिमेट/फोरेट व इतर अत्यंत विषारी प्रतिबंधित किटकनाशके वापर करण्यात येऊ नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. तरी प्रतिबंधित असलेले अथवा बोगस बियाणे, खते, किटकनाशके जिल्ह्यात विक्रीस आणू नये तसेच प्रतिबंधित किटकनाशक वापर/विक्री करतांना आढळल्यास कृषि विभागाच्या नियंत्रण कक्ष क्रमांक 7218817577 यावर तक्रार नोंदवावी अथवा जवळच्या तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तक्रारीची नोंद घेऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.
000000