पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजयकुमार प्रसाद हा गणित या विषयाचे ट्युशन क्लासेस घेतो. तो विकृत प्रवृत्तीचा असून त्याची नेहमी वर्गातील विद्यार्थिनींवर वाईट नजर असते. पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी अकरावीत शिकत असून गेल्या एका वर्षापासून अजयकुमार याच्याकडे शिकते. तिचे वडिल शासकीय सेवेत कार्यरत आहेत. तिला शिक्षकाने अन्य विद्यार्थ्यांसोबत द्वारका वॉटर पार्क येथे सहलीसाठी नेले होते. तेथून परत आल्यानंतर त्याने मुलीला फोन केला आणि पार्टी व भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ममता मॉलजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने रुम बूक केली. मुलीला घेऊन तो हॉटेलमध्ये गेला. तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि हॉटेलबाहेर पळत आली. तिने आरडाओरड केल्याने काही नागरिक गोळा झाले.नागरिकांनी शिक्षकाला जबर मारहाण केली आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यात आणले. ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी मुलीच्या आईवडिलांना बोलावून घेतले. आईच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. अजयकुमार प्रसाद याच्या शिकवणी वर्गातील अन्य काही मुलींवर असाच प्रकार केल्याची चर्चा पोलीस ठाण्यात होती. त्यामुळे या शिक्षकाविरुद्ध काही तक्रार असल्यास यशोधरानगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Social Plugin