शिक्षक आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद येथे समस्या निवारण सभा
आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद येथे समस्या निवारण सभा
सारस एक्सप्रेस
गोंदिया : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शिक्षक कार्यालयात समस्यांबाबत गेले असता अधिकारी, कर्मचारी समस्या मनावर घेत नाहीत. याबाबत शिक्षकांच्या अनेक तक्रारी आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर आमदार अडबाले यांनी बैठक लावून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले व इतकेच नाही तर प्रलंबित प्रकरणे एका महिन्याच्या आत निकाली काढण्याची तंबीही दिली. विशेष म्हणजे, ही समस्या निवारण सभा तब्बल साडेसहा तास चालली. शिक्षकांच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील ही ऐतिहासिक सभा झाल्याचे मत शिक्षक व्यक्त करीत होते.
नागपूर विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या 'समस्या तुमच्या पुढाकार आमचा' या 'विमाशि'च्या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकांच्या समस्या निवारणासाठी गोंदिया जिल्हा परिषदेतील सभागृहात समस्या निवारण सभा सोमवारी (ता. २६) पार पडली.
या समस्या निवारण सभेत टप्पा अनुदान वाढबाबत चर्चा करणे, वन हेड वन व्हाउचर योजना गोंदिया जिल्ह्यात कार्यान्वित करणे, प्रलंबित वैद्यकीय देयके, वरिष्ठ श्रेणी / निवड श्रेणी फरकाची देयके, जीपीएफ परतावा/ ना परतावा देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अंतिम प्रदान देयके, कर्मचाऱ्यांना दुय्यम सेवा पुस्तिका देणे, प्रलंबित वरिष्ठ / निवड श्रेणी बाबत चर्चा करणे, वेतन दरमहा एक तारखेला अदा करणे, जीपीएफ/एनपीएस पावत्या वितरणाची सध्यस्थिती, सहाव्या - सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते, संच मान्यता, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित सेवानिवृत्त प्रस्ताव, सेवानिवृत्ती उपदान बाबत चर्चा करणे व इतर अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली. सोबतच अनेक वैयक्तिक प्रकरणांवर चर्चा करून वैयक्तिक व सामूहिक प्रकरणे २० जुलैच्या आत निकाली काढण्याचे शिक्षण विभागास आमदार सुधाकर अडबाले यांनी आदेश दिले. व एका महिन्यानंतर याच विषयावर आढावा बैठक घेणार असल्याचे आमदार अडबाले यांनी निर्देश दिले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी (माध्य.) कादर शेख, शिक्षणाधिकारी (प्राथ.) गजभिये, पे युनिट अधीक्षक जयप्रकाश जिभकाटे, विमाशि संघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश गुप्ता, जिल्हा कार्यवाह संदीप मांढरे, उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, सचिन राठोड, अशोक नागपुरे, रंजीत राठोड, रतन वासनिक, सूर्यकांत केंद्रे, दिनेश बहेकार, महेश रहांगडाले, सेंद्रे, फुन्ने, सुशीलकुमार गुनेरिया, विदर्भ शिक्षक संघाचे रेशीम कापगते, विजय भोगेकर, व्ही. यू. वंजारी, प्रकाश बघेले, शेखर भालाधरे, विनोद चव्हाण, सुनील आवळे, प्राचार्य बोपचे मॅडम व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विमाशी संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांनी मानले आमदार अडबालेंचे आभार
आजवर अनेक शिक्षक आमदार झाले. पण कोणीही प्राथमिक विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. मात्र आमदार सुधाकर अडबाले यांनी प्राथमिक विभागाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन नागपूर विभागात सर्वच जिल्ह्यात बैठका घेत आहेत. यासाठी प्राथमिक शिक्षकांनी आमदार अडबाले यांचे विशेष आभार मानले. काल सोमवारी जिल्हा परिषदेत माध्यमिक विभागाच्या बैठकीनंतर प्राथमिक विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत समस्या निवारण सभा घेतली. यात प्रामुख्याने उच्च श्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या पदोन्नती करण्याबाबत चर्चा करणे, चटोपाद्याय वेतनश्रेणी लागू असलेल्या शिक्षकांना एकस्तर वेतन श्रेणी चालू ठेवणे व भविष्यात अतिप्रदान वसुली न करणे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या दुसरा व तिसरा हप्ता अदा करणे, डीसीपीएस/ एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना प्राण नंबर देणे. त्यांच्या एनपीएस पावत्या वितरण सध्यस्थिती, शिक्षकांच्या GPF पावत्या वितरणाची सद्यस्थिती, शाळेमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०, ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, प्रलंबित वरिष्ठ श्रेणी/ निवड श्रेणी प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याबाबत चर्चा करणे, प्रलंबित वैद्यकीय देयके बाबत चर्चा चर्चा करणे, मंजूर झालेल्या वैद्यकीय देयकांची तात्काळ प्रतिपूर्ती करणे, सेवानिवृत्त शिक्षकांकडून करण्यात आलेली संगणक वसुली व नक्षल भत्ता परत मिळण्याबाबत चर्चा करणे व इतर अनेक समस्यांसोबतच वैयक्तिक समस्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली. ही सर्व प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागास आमदार अडबाले यांनी दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथ.) गजभिये, लेखाधिकारी बागडे, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते विजय भोगेकर, गोंदिया जिल्हा अध्यक्ष राजानंद वैद्य, जिल्हा सरचिटणीस हरिराम येळणे, जिल्हा नेते एन. सी. विजयवार, दमयंती वैद्य, महिला अध्यक्ष प्राजक्ता रणदिवे, संगीता घासले, व्ही. यू. वंजारी आदींची उपस्थिती होती.
Social Plugin