विना परवाना खत विक्री करणाऱ्या दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल

विना परवाना खत विक्री करणाऱ्या दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल 
भरारी पथकाची कार्यवाही : 1.93 लाखांचा खत जप्त
       सारस न्यूज एक्सप्रेस 
   गोंदिया, दि.30 : गोरेगाव तालुक्तील मुंडीपार व हेटी (पालेवाडा) येथे विना परवाना खत विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती कृषि विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर कृषि विभागाच्या भरारी पथकाने टेकराम कटरे, मुंडीपार येथे घाडीत 80 बॅग भू-वर्धन ऑरग्यानिक खत रक्कम 1 लाख 3 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्ती केला. तसेच मंगरु मेश्राम हेटी (पालेवाडा) येथून 70 बॅग भू-वर्धन ऑरग्यानिक खत रक्कम 90 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. असे एकुण 1 लाख 93 हजार 500 रुपयांचा माल जप्त करण्यात आले. ही कार्यवाही 28 जुलै 2023 रोजी करण्यात आली असुन विना परवाना खत विक्री करणारे टेकराम कटरे व मंगरु मेश्राम यांच्याविरुध्द गोरेगाव पोलिस स्टेशन येथे खत नियंत्रण आदेश 1985 कलम 7, अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 कलम 3(2)(a), 3(2)(d), 7 व भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 34 नुसार अपराध क्रमांक 0430 दिनांक 29 जुलै 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
         ही कार्यवाही विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषि विकास अधिकारी महेंद्र मडामे, तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश रामटेके कृषि अधिकारी, पंचायत समिती, गोरेगाव  यांच्या फिर्यादीवरुन करण्यात आली. सदर कार्यवाहीमध्ये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यसलव बावनकर, जि.प. जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) पी.डी. कुर्वे, अतुल येडे कृषि अधिकारी पंचायत समिती, गोंदिया यांनी सहकार्य केले.
         जिल्हयातील शेतकऱ्यांनी अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करावे व त्याचे पक्के बिल विक्रेत्यांकडून घ्यावे. जिल्ह्यात कोणीही अनाधिकृत अथवा विना परवाना असलेले बियाणे, खते व किटकनाशके विक्री करु नये अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे.