गोंदिया, –. तालुक्यातील ईर्री ग्राम पंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक नरेश बघेले यांनी मोठ्या प्रमाणात कामात अनियमीतता केली. त्यांच्या चुकीमुळे परिचराला आत्महत्या करावी लागली. तर तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली. या सर्व प्रकरणांत १२ मुद्दे असलेली तक्रार जि.प. सदस्य लक्ष्मी तरोने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. त्यातील ८ मुद्द्यांत सत्यता आढळल्यामुळे १९ जुलै रोजी ग्रामसेवक नरेश बघेले यांना निलंबित करण्यात आले.
गोंदिया तालुक्यातील इर्री येथील तत्कालीन ग्रामसेवक नरेश बघेले याच्या अनागोंदी कारभाराला पदाधिकारी आणि कर्मचारी देखील त्रासले होते. ग्रामसेवकाची वारंवार तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र त्याकडे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले. परिणामी ग्रामसेवक बघेले याचे मनोबल उंचावले होते. अशातच परिचराने आत्महत्या केली. ग्रामसेवकाच्या दुर्लक्षामुळे तत्कालीन प्रभारी सरपंचांना तुरुंगात देखील जावे लागले होते. या ग्रामसेवकाची तक्रार जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी तरोणे यांनी २ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. कामात अनियमितता, भ्रष्टाचार, शौचालयाचे अनुदान लाभार्थींना न देणे अशा विविध १२ मुद्द्यांचा त्यात समावेश होता. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली. त्यातील ८ मुद्द्यांत दोषी आढळल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १९ जुलै रोजी आदेश काढत ग्रामसेवक नरेश बघेले याला निलंबित केले
Social Plugin