सारस न्यूज़ एक्सप्रेस
गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतले जात असते. खरीप हंगामात धान, तुर, मुंग, उडीद इत्यादी पिकांचा समावेश असतो. सध्या खरीप हंगाम सुरु असून शेतकरी शेतीच्या कामात गुंतलेला आहे. आपण सध्या आधुनिक शेतीच्या वाटेवर वाटचाल करत असून उत्पादन वाढीसाठी आपण विविध प्रकारचे प्रयोग शेतीत करत असतो. रासायनिक खतांचा वापर असंतुलीत होत असतो, त्यामुळे साहजिकच शेतीच्या उत्पादनात खर्च वाढत जातो. परंतु रासायनिक खतांचा योग्य वापर करण्यासाठी जर माती परीक्षण करुन माती परीक्षण नंतर दिल्या जाणाऱ्या पिकनिक शिफारसीचा विचार करुन खताची योग्य मात्रा दिल्यास उत्पादन खर्च कमी होऊन रासायनिक खतांच्या असंतुलीत वापरामुळे होणाऱ्या जमिनीचे मातीचे नुकसान टाळता येऊ शकते. याकरीता रासायनिक खत वापरामध्ये बचत करुन पिकानुसार व जमिनीच्या प्रतवारीनुसार गरजा या गोष्टीची संपूर्ण माहिती असावी, हेच आर्थिक फायद्याचे ठरु शकते.
युरियाच्या अतिरिक्त वापराचे दुष्परिणाम पिकाची अधिक वाढ होते. विशेष करुन पिकाची पाने लुसलुशीत आणि मऊ होतात, त्यांना टणकपणा व कणखरपणा कमी झाल्याने कीड रोगाच्या विशेष करुन रससोसक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. साहजिकच किटकनाशकाचा वापर करणे भाग पडते आणि उत्पादन खर्चात वाढ होते. युरिया खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीचे आरोग्यावर परिणाम होते, जमिनीतील कार्बन नत्राचे गुणोत्तर कमी होऊन सुक्ष्मजीवांची संख्या कमी होते. त्यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनात घट होते. मृदा आरोग्य अबाधित राखण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन चालना देण्याकरीता मृदा तपासणीवर आधारित राज्यात 31 जिल्हा स्तरावर शासकीय मृदा तपासणी प्रयोगशाळा असून या प्रयोगशाळांमध्ये प्रमुख व सुक्ष्म अन्नद्रव्य विश्लेषण करण्यात येते व त्यानुसार खताचा वापर व शिफारस करण्यात येते. त्याप्रमाणे खताचे नियोजन केल्यास बऱ्याच प्रमाणात रासायनिक खतांची बचत करता येईल व साहजिकच उत्पादनात खर्च कमी होईल.
नॅनो युरिया व नॅनो डीएपी खताचा वापर :- नॅनो युरिया हा नत्राचा स्त्रोत असून नॅनो डीएपी हे नायट्रोजन व फॉस्फरसचे उत्कृष्ट स्त्रोत असून हे द्रव्य रुपातील खते असल्यामुळे यांचा वापर जमिनीद्वारे न करता पाण्यावर फवारण्यासाठी केला जातो. यामुळे जमिनीचे आरोग्य, पाणी व पर्यावरण प्रदुषण होणार नाही. पारंपारिक खताच्या किंमतीपेक्षा कमी असल्यामुळे उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे साहजिकच उत्पन्नात जास्त वाढ होईल. बाजारामध्ये उपलब्ध नॅनो युरियाची 500 मिलीमीटर बॉटलची किंमत 225 रुपये असून पारंपारिक युरियाच्या 45 किलोची किंमत 266 रुपये आहे. पिकासाठी उपलब्ध नत्राचे प्रमाण तुलनात्मक सारखेच आहे. नॅनो डीएपीची 500 मिलीमीटर बॉटलची किंमत 600 रुपये असून पारंपारिक डीएपीच्या 50 किलोची किंमत 1350 रुपये आहे. तुलनात्मक दृष्ट्या उत्पादन खर्चाचा विचार केल्यास पारंपारिक युरिया व डीएपी एैवजी नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर कमी खर्चाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी (द्रवरुप) खताचा वापर करुन भरघोष उत्पन्न घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण व कृषि विकास अधिकारी महेंद्र मडामे यांनी केले आहे.
Social Plugin