मंडळांना दान मिळणाऱ्या वस्तुंचा हिशेब सादर करावा : सहायक धर्मादाय आयुक्त

मंडळांना दान मिळणाऱ्या वस्तुंचा हिशेब सादर करावा : सहायक धर्मादाय आयुक्त .        सारस न्यूज एक्सप्रेस 
 गोंदिया,  : जिल्ह्यात गणेश उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ व इतर सार्वजनिक उत्सव मंडळ उत्साहाने साजरे करण्यात येतात. धार्मिक श्रध्देने भाविक वर्गणी व मौल्यवान दागदागीने मंडळांना दान देतात. श्रध्देने मिळालेल्या दानाचा कोणत्याही प्रकारे दुरुपयोग होवू नये याकरीता (महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा 1950 अन्वये) मंडळांनी सार्वजनिक उत्सव संपल्यानंतर हिशोबपत्रके सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सादर करणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
        सार्वजनिक न्यास नोंदणी या कार्यालयाची कलम 41(क) अंतर्गत परवानगी घेवून तथा परवानगी न घेता उत्सव साजरा करणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ व इतर सार्वजनिक उत्सव मंडळ यांनी उत्सव संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत सहाय्यक संस्था निबंधक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त, गोंदिया यांचेकडे हिशोबपत्रके सादर करावेत. तसेच दान म्हणून ‍मिळालेले मौल्यवान दागदागीने व वस्तु स्वरुपात आलेल्या दानाचे या प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगीशिवाय परस्पर विल्हेवाट व लिलाव करु नये. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. तसेच दरवर्षी नव्याने परवानगी घेवून उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी नोंदणी (कायमस्वरुपी) प्रस्ताव या प्राधिकारीकडे तात्काळ सादर करावेत. असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त दिशा पजई यांनी कळविले आहे.