विकसीत भारत संकल्प यात्रा’’ गावोगावी होणार शासकीय योजनांचा जागर

▪ फिरत्या एलईडी वाहनांद्वारे प्रसिद्धीचे नियोजन   
▪ मान्यवरांनी दाखविली हिरवी झेंडी
        सारस एक्सप्रेस गोंदिया :-
 भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लक्ष निर्धारीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह विकसीत भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे व्यापक मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या एलईडी वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. 
        यावेळी खासदार सुनिल मेंढे, जि.प.बांधकाम सभापती संजय टेंभरे, समाज कल्याण सभापती पुजा सेठ, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गोविंद खामकर, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) सुमित बेलपत्रे,   नाबार्डचे व्यवस्थापक अविनाश लाड, मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त चित्रांगणा सलामे, जिल्हा विज्ञान सूचना अधिकारी पंकज गजभिये, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, प्रभारी आकाशवाणी गोंदिया मुकेश डोंगरे, आरसेटीचे व्यवस्थापक राहुल गणवीर व इतर उपस्थित होते.
        आजवर जे वंचित घटक विकासाच्या प्रवाहात येऊ शकले नाहीत, अशा लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यावर या प्रसिद्धी मोहिमेत भर दिला जाणार आहे. सर्व सामान्यांच्या विकासासाठी विविध विकास योजना प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. या यात्रेतून दुर्गम भागातील प्रत्येक गावात ज्या व्यक्तींना आजवर कोणत्या योजना मिळाल्या नाहीत अशा लाभार्थ्यांची निवड करून त्यांना त्या-त्या योजनांचा लाभ देण्याचे नियोजन या मोहिमेत करण्यात आले आहे.
        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून “विकसीत भारत संकल्प यात्रा” होत असून केंद्र सरकार, राज्य सरकार यासाठी प्रयत्नरत आहे. उज्ज्वला सारखी योजना, आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना प्रत्येक गावात पोहोचविली जात आहे. चार फिरते वाहन जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आहेत.
        शहरी भागासाठीच्या १७ व ग्रामीण भागाच्या १७ अशा एकूण ३४ फ्लॅगशिप (महत्वाकांक्षी) योजनांची सचित्र माहिती या चित्ररथावर फ्लेक्स स्वरूपात अंकीत केलेली आहे. त्याच सोबत योजनांची माहिती असलेले मुद्रित साहित्य सुद्धा देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या या मोहिमेत नागरिकांनी व लाभार्थ्यांनी सहभागी होऊन माहिती घ्यावी तसेच आपला फीडबॅक कळवावा असे आवाहन सह सचिव तथा मिशन संचालक स्मार्ट सिटी मिशन कुणाल कुमार, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. 
         योजना ग्रामीण भाग- आयुष्मान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, पीएम आवास योजना ग्रामीण, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, किसान क्रेडिट कार्ड, पीएम किसान सन्मान योजना, पीएम पोषण अभियान, हर घर जल जल जीवन मिशन, स्वामित्र योजना, जनधन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, पीएम प्रणाम योजना व नमो फर्टिलायझर योजना.
      योजना शहरी भाग- पीएम स्वनिधी, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, मुद्रा लोन योजना, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, आयुष्मान भारत, पीएम आवास योजना शहरी, स्वच्छ भारत अभियान, पीएम ई-बस सेवा, अमृत योजना, भारतीय जन औषधी परियोजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर, खेलो इंडिया, उडान व वंदे भारत ट्रेन आणि अमृत भारत स्टेशन योजना या योजना केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजना आहेत.