भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, पाच जखमी

    सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया 
गोंदिया : तालुक्यातील एकोडी दांडेगाव येथे टवेरा वाहनाला अपघात होऊन चौघांचा मृत्यू तर पाच ते सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोघांचा घटनास्थळी तर दोघांचा रुग्णालयात नेतांना मृत्यू झाला. जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व के. टी. एस. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.

तिरोडा तालुक्यातील करटी बुुजूर्ग येथील साक्षगंध समारंभानिमित्त वऱ्हाडी हे टवेरा वाहनाने गोंदिया तालुक्यातील जुनेवाणी येथे येत असतांना दांडेगावच्या चौकात ही घटना घडली. २६ डिसेंबर रोजी मौजा दांडेगाव येथे गोंदिया तिरोडा महामार्गावर तिरोडा करटी वरुण गोंदिया कड़े मजीतपुर येथे उइके कुटुंबीयच्या घरी  साक्षगांधच्या कार्यक्रम निमित्त वरात घेऊन जात असता दांडेगाव येथे भरधाव वेगाने येत असलेल्या टवेरा वाहन (MH 40,A 4243) च्या ड्राइवर अतुल नानाजी पटले (२३) वर्ष राहणार अर्जुनी परसवाड़ा यांनी वेगात असलेल्या वाहनाचे एकदम ब्रेक लावल्यामुळे सदर वाहन हे दोन तीन पलट्या घेत राज्य महामार्गावरील दांडेगाव येथे डाव्या बाजूला लागून असलेल्या रोहिणी प्रसाद बिरणववार (रा. दांडेगाव) यांच्या घराच्या अंगणात विद्युत पोललगत असलेल्या विटांच्या ढिगाऱ्यावर जाउन आदळल्याने मोठा अपघात झाला. वाहनात चालकासह बारा लोक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अपघात स्थळावर दोन महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये छाया अशोक इनवाते (रा. करटी), अनुराधा हरिचंद कावळे (रा. करटी), तसेच एक पंधरा महिन्याच्या चिमुकल्याचा सामान्य रुग्णालय उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका मृताचे नाव कळू शकले नाही. या अपघातात गीता प्रितिचन्द इनवाते (५५ रा. करटी ता. तिरोडा), पदमा राजकुमार इनवाते (५० रा. भुराटोला तिरोडा), बिरजुला गुडन ठाकरे (३५ रा. आरम्भाघोटी जि. बालाघाट), अहिल्याबाई नामदेव कोडवाते (६२ रा. करटी तिरोडा), तसेच वाहन चालक अतुल नानाजी पटले (२३ रा. अर्जुनी परसवाड़ा) यांच्यावर के.टी.एस . जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक बनसोडे यांच्या मार्गदर्शनात गंगाझरी पोलिस पथकाकडून सुरु आहे.