समृद्ध भारतासाठी मतदान करा : खासदार सुनील मेंढे

             सारस न्यूज एक्सप्रेस 
भंडारा: नवभारताच्या निर्माणासाठी नव मतदारांनी सकारात्मक भाव ठेवून लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदानाच्या अधिकाराचा वापर करावा असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले.
आज राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून नव मतदार संमेलनाचे आयोजन ज.मू. पटेल महाविद्यालयात करण्यात आले होते. देशभर आयोजित या संमेलनाचे आभासी पद्धतीने उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी काही नवं मतदारांशी त्यांनी संवादही साधला. दरम्यान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना खासदार सुनील मेंढे यांनी निराशावादी मानसिकता सोडून आशावादी बना असा महत्त्वाचा सल्ला तरुणांना दिला. सरकारने आमच्यासाठी काय केले हे म्हणताना, आपण सरकार तयार करण्याच्या दृष्टीने मतदानाच्या माध्यमातून दिलेले योगदान समजून घेतले पाहिजे. मतदानाच्या हक्काने लोकशाही मजबूत होते. मात्र मतदानाच्या दिवशी आम्ही मतदान न करता फिरायला जातो. आम्हालाच आमच्या कर्तव्याचा विसर पडतो आणि मग राज्यकर्त्यांना दोष देऊन मोकळे होतो. मागील काही वर्षात देशात आलेले परिवर्तन आणि मोकळ्या झालेल्या विकासाच्या वाटा बळकट लोकशाहीचे आणि सकारात्मक भाव ठेवून केलेल्या मतदानाचे परिणाम आहेत. मतदान कोणाला करावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असला तरी अधिकार मात्र बजावलाच गेला पाहिजे. त्यामुळे नव मतदारांनी मतदान हे कर्तव्य समजून त्याचे पालन करावे असे आवाहनही यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने झाले. महाविद्यालयाचे समन्वयक कार्तिक पन्नीकर व भाजप युवा मोर्चा पदाधिकारी निशिकांत इलमे, आकाश फाले, पंडित तांडेकर यावेळी उपस्थित होते