रामटेक काँग्रेससाठी इच्छुकांची लॉबिंग-ठाकरे गटाने तीन टर्मचा दावा सोडला

नागपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने रामटेक लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडला आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे ठाकरे पक्षाने स्पष्ट केले आहे. आता काँग्रेस उमेदवारांनी लॉबिंग सुरू केली आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती असताना रामटेकची जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. हा मतदारसंघ खुला असताना सुबोध मोहितेनी तो काँग्रेसकडून खेचून शिवसेनेच्या पदरात टाकला. पुढे मोहितेनी सेना सोडली. काँग्रेसमध्ये गेले. तेव्हा झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रकाश जाधव विजयी झाले होते. २००९ मध्ये मतदारसंघांच्या पुनसर्सीमांकनानंतर रामटेक अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यानंतर झालेली पहिली निवडणूक काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांनी जिंकली. नंतरच्या दोन्ही निवडणुका शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांनी जिंकल्या. सेना फुटली असताना विद्यमान खासदार कृपाल तुमाने हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे महायुतीत ही जागा शिवसेना मागत आहे. तर ‘मतदारसंघात आमची ताकद आहे. तुम्ही मन मोठे करा, आम्हाला जागा सोडा’, अशी विनंती भाजप शिंदे यांना करीत आहे. दुसरीकडे महायुतीत प्रारंभी ही जागा ठाकरेंच्या सेनेने मागितली होती. गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असल्याने काँग्रेसनेही ती जागा मागितली. आज, सोमवारी या वादावर पडदा पडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी रामटेकची जागा काँग्रेसला सोडत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार सक्रिय झाले आहेत. काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, नरेश बर्वे आणि उमरेडचे आमदार राजू पारवे यांचीही नावे चर्चेत आहेत