जीवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने बापलेकाचा मृत्यूप्रसंगावधानाने मुलगी बचावली

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील मोरगाव येथे शेतातील कुंपणाला असलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या संपर्कात  बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. वडिल व भाऊ घरी का परतले नाही, हे पाहण्यासाठी गेलेली मुलगी प्रसंगावधनाने थोडक्यात बचावली. ही घटना २१ मार्चच्या रात्री १० वाजता सुमारासची आहे. वामन दुधराम हातझाडे (५०) व संतोष वामन हातझाडे (२४) असे मृतक बापलेकाची नावे आहेत.या घटनेने मोरगाव परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, मोरगाव येथे ईश्वरदास पर्वते (४७) यांच्या घराला लागून शेतशिवार आहे. पर्वते यांनी शेतात मका पिकाची लागवड केली आहे. पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे, याकरीता कुंपण तयार करण्यात आले आहे. त्या कुंपणाला पर्वत यांनी विज प्रवाह दिला होता. २१ मार्चच्या रात्री शेजारी राहत असलेले   वामन हातझाडे हे शेतशिवाराकडे गेले होते. दरम्यान कुंपणाला असलेल्या  विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. वडिल आतापर्यंत घरी का परते नाही, हे पाहण्यासाठी संतोष वामन हातझाडे हा देखील गेला.
परंतु, वडिल जमिनीवर पडून दिसल्याने त्यांना का झाले? हे पाहण्यासाठी गेलेल्या संतोषही कुंपणाला असलेल्या  विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने (Bapleka Death) त्याचाही मृत्यू झाला. बराच वेळा होऊन वडिल व भाऊ का आले नाहीत, यासाठी मुलगी देखील गेली. घटनास्थळावर भाऊ व वडिल पडून असल्याचे दिसून आल्याने तिने आरडाओरड केली आणि घटनेचे बिंग फुटले. प्रसंगावधान राखल्यानेच वामन हातझाडे यांची मुलगी या घटनेत बचावली. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन दोन्ही बापलेकांना रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. अर्जुनी मोरगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी आरोपी ईश्वरदास पर्वते याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे मोरगावात शोककळा पसरली आहे.