जिल्हा पोलिसांचा कोंबिंग ऑपरेशन◼️एका गुप्तीसह दारूबंदी, जुगार, अंमली पदार्थ कायद्यान्वये लाखोंचा मुद्देमाल जप्त

गोंदिया : आगामी लोकसभा निवडणूक व सण उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अवैध व्यवसायिक व गुंड प्रवृत्तीच्याविरुध्द २३ व २४ मार्च या कालावधीत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले ज्यामध्ये पोलिसांनी एक बंदूक व काडतूसीसह पाच तलवार, एक गुप्ती व जुगार, अंमली पदार्थ कायद्यान्वये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवैध कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी आगामी सन उत्सवाच्या व निवडणुकीच्या अनुषंगाने संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे हद्दीत दिवस, रात्र दरम्यान प्रभावी गस्त, कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी, राबविण्याबाबत आणि यादरम्यान सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सुचनेप्रमाणे संपुर्ण जिल्ह्यात कारवाई करण्याकरिता मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आलेला आहे. यादरम्यान अवैध धंद्यावर धाडी, गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी गस्त पेट्रोलिंग, त्याचप्रमाणे अवैध शस्त्रे बाळगणारे, दहशत माजविणारे गुन्हेगारांवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याकरिता सम्पूर्ण गोंदिया जिल्हा पोलीसांचे कारवाई पथके नेमण्यात येवुन २३ ते २४ मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या.

उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे नेतृत्वात गोंदिया उपविभागातील गोंदिया शहर, रामनगर, गोंदिया ग्रामीण परिसरात रात्र दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा, शहर पोलिस व सी- ६० पथकाने संयुक्तरित्या कारवाईची प्रभावी कोंबिंग ऑपरेशन ची मोहीम राबविली. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गोंदिया शहर हद्दीत पैकणटोली गौतमनगर, कुंभारेनगर, सावराटोली, छोटा गोंदिया, रामनगर, कुडवा, जब्बारटोला या परिसरातील रेकॉर्डवरील व सर्व सराईत गुन्हेगारांना चेक करण्यात आले व त्यांचे घराची झाडाझडती घेण्यात आली.