सारस एक्सप्रेस गोंदिया
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात मंगळवारी रात्री 7.30 च्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे परिसरातील अनेक घरांचे छते उडाली तर अनेक भागात वृक्ष मार्गावर पडले. तालुक्यांतील पिंडकेपार येथिल विजेंद्र उर्फ बबलू कटरे यांचे घराचे संपूर्ण छत उडाल्याने त्यांचे कुटुंब बेघर झाले आहे. या घटनेची माहिती गोरेगाव तहसील प्रशासनाला देण्यात आली आहे. याचप्रमाणे परिसरातील मोठे झाडे पडून काही वेळासाठी मार्गावरील दळणवळण प्रभावीत झाले होते. गोरेगाव तहसील कार्यालयाच्या समोरील अनेक झाडे तुटल्याची ही माहिती आहे.
👉रस्त्यांवर साचले पाणी:
मार्च महिन्यात सुद्धा अनेक वेळा झालेल्या अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अक्षरश: झोडपून काढले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांची आणि फळबागांची नासाडी झाली होती. 23 एप्रिल मंगळवारला पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले होते. या रस्त्यांहून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली.
👉वीटभट्टीचे मोठे नुकसान:
गोरेगांव तालुक्यात याआधीसुद्धा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाजीपाला लागवड करणारा शेतकरी संकटात सापडले होते. पण वीटभट्टी मालक देखील दुहेरी संकटात सापडले आहेत. एका बाजूने वीटभट्टी मजूरकरांनी बनवलेल्या कच्च्या विटांचा मोबदला देत असतानाच अवकाळी पावसामुळे बनवलेल्या लाखो कच्या विटा पावसाच्या पाण्यात विरघळून गेल्या आहेत. यामुळे वीटभट्टी उत्पादन दुहेरी संकटात सापडले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पण वीट भट्टी संचालकांना नुकसान भरपाई नियमानुसार मिळू शकणार नाही कारण की वीट भट्ट्यांना शासनाकडून कोणत्याच प्रकारची अधिकृत परवानगी देण्यात आली नाही.
👉आंब्याचे मोठे नुकसान
गोंदिया जिल्ह्यात आंब्याचे झाडे मोठ्या प्रमाणात असल्याने यावर्षी आंबे खूप प्रमाणात लागलेले आहेत .मात्र मंगळवारला आलेल्या वादळी वाऱ्या व पावसामुळे आंब्यांच्या फळांना मोठे नुकसान झाले आहे .वादळी वाऱ्याने अनेक आंब्याचे झाडांचे फांद्या तुटून खाली पडले तर झाडाला लागलेले आंबे गळून पडले आहेत. त्यामुळे आंबे उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयाचे नुकसान पोहोचले आहे.
शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मंगळवारी झालेल्या वादळीवारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेकांच्या घरांची पडझड सुद्धा झालेली आहे अशा सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व आपत्तीग्रस्तांचे सर्वे करून पंचनामे करावे व तात्काळ नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
Social Plugin