गोंदिया जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे संकट◼️१६ मे पर्यंत येलो अर्लट

          सारस न्यूज एक्सप्रेस 
गोंदिया : हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्यानुसार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भाजीपाला, आंबा पिकासह ऊन्हाळी धान पिकाला फटका बसला. यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा विजेच्या कडकडाटीसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांवर पुन्हा अवकाळीचे संकट निर्माण झाले आहे.
मागील महिन्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.  दर चार दिवसांनंतर जिल्ह्यात पावसाची नोंद होत आहे. विशेष म्हणजे, पाच दिवसांपूर्वीच जिल्ह्याला वादळी अवकाळी पावसाने झोडपून काढले, याचा फटका भाजीपाला व आंबा पिकाला बसला. विशेषतः ऊन्हाळी धान पिकाचे या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर कापणी केलेले धानाचे कळप व मळणी केलेले धान पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा १३ ते १६ मे या कालावधीत जिल्ह्यातील काही भागात विजेच्या कडकडाटीसह वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली असून भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांसह धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या अवकाळी पावसाची धास्ती निर्माण झाली आहे. 
 
       ◼️३ दिवस येलो अर्लट 
काल रात्री जिल्ह्यातील काही भागात पावसाची नोंद करण्यात आली असताना हवामान खात्याकडून जिल्ह्यात १३ ते १६ मे या कालावधीत पावसाचा येलो अर्लट देण्यात आलेला आहे. यात विजेच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला असून वाऱ्याचे वेग ४० ते ५० किमी प्रति तास राहणार असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.