जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
गोंदिया : कुक्कुट पालन योजनेंतर्गत मंजूर झालेल्या शेड बांधकामाचे बिल काढून देण्याच्या नावावर गेल्या वर्षी ३ ऑगस्ट २०२३ रोजी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पशुधन विकास अधिकाऱ्याला मदत केल्याच्या आरोपावरून गोंदिया पंचायत समितीतील पशुधन पर्यवेक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, (दि.२१) अटक केली आहे. तेजराम हौसलाल रहांगडाले ( वय ५७) पशुधन पर्यवेक्षक वर्ग-३, पंचायत समिती गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
लाभार्थी तक्रारदार यांना महाराष्ट्र शासनाचे नाविन्य पुर्ण योजने अंतर्गत १००० मांसल कुक्कुट पक्षीगट योजनेअंतर्गत कुक्कुट पालनाकरीता शेड मंजूर करण्यात आले होते. दरम्यान, उभारणी केलेल्या शेडचे शासनाकडुन योजनेतंर्गत मिळणाऱ्या अनुदानाचे दुसऱ्या हप्त्याचे १ लाख रुपयांचे धनादेश काढुन देण्याकरीता गोंदिया पंचायत समितीतील प्रभारी पशुधन विकास अधिकारी (वर्ग-१) आरोपी जयंतप्रकाश ईश्वरदास करवाडे, (वय ३९ ) याने १२ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली होती. यावर तक्रारदार यांच्या तक्रारीवरून ३ ऑगस्ट २०२३ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा कारवाई केली असता आरोपी प्रभारी पशुधन विकास अधिकारी जयंतप्रकाश करवाडे यास खाजगी इसम महेन्द्र हगरु घरडे, (वय ५० ) याच्या माध्यमातून तडजोडीअंती १० हजार रुपये स्विकारताना ताब्यात घेतले होते. तर दोघांच्या विरोधात ४ ऑगस्ट २०२३ रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात अप.क्र. ५१२/२०२३ कलम ७, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांनी तपास केले असता गोंदिया पंचायत समितीतील आरोपी पशुधन पर्यवेक्षक तेजराज रहांगडाले याने आरोपी पशुधन विकास अधिकारी जयंतप्रकाश करवाडे व खासगी इसम महेंद्र घरडे यांना लाच रक्कम स्विकारण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, मंगळवार (दि.२१) आरोपी पशुधन पर्यवेक्षक तेजराम रहांगडाले यास अटक केले आहे.
Social Plugin