सारस एक्सप्रेस
गोंदिया, दि.20 : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या पात्र कुटूंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्यशासनाने “मोदी आवास” योजना राबविण्यास मान्यता दिलेली आहे.
सदर योजनेअंतर्गत ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील पात्र कुटूंबांना नविन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या डोंगराळ/दुर्गम भाग क्षेत्रामध्ये घरकुल बांधकामाकरीता प्रति घरकुल 1 लाख 30 हजार रुपये व सर्वसाधारण क्षेत्राकरीता प्रति घरकुल 1 लाख 20 हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात येते. सदर योजनेअंतर्गत प्राधान्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल व तद्नंतर मान्यतेसाठी जिल्हा स्तरावर पाठविण्यात येईल.
लाभार्थी पात्रतेचे निकष : लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे. लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयेपेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटुंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण/ गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन:श्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाही. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये (PWL) समाविष्ठ नसावा.
आवश्यक कागदपत्रे :
सातबारा उतारा/ मालमत्ता नोंदपत्र/ ग्राम पंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्राम पंचायत प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायाप्रत, कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपयेपेक्षा कमी असल्याचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/ विद्युत बिल/ मनरेगा जॉब कार्ड, लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकित प्रत.
Social Plugin