मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा जिल्हास्तरीय भव्य शुभारंभ

.        सारस न्यूज एक्सप्रेस 
  गोंदिया : राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली. या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ पुणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात या योजनेचा जिल्हास्तरीय भव्य शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 
         यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (बालकल्याण) संजय गणवीर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, रमेश ताराम यांच्यासह लाभार्थी महिला मोठ्या  संख्येने उपस्थित होत्या.   
        यावेळी लाभार्थी लाडक्या बहिणी उत्स्फूर्तपणे उपस्थित होत्या. लाडकी बहीण योजना अडीअडचणीच्या कामी आली अशी त्यांची भावना होती. खात्यात पैसे जमा झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. रक्षाबंधन पूर्वीच ओवाळणी मिळाली अश्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. ही योजना कधीही बंद होणार नसून भविष्यात या रकमेत वाढ केली जाईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
         मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार बहिणींचे अर्ज पात्र ठरले होते, यापैकी 2 लाख 85 हजार बहिणींच्या खात्यावर बुधवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव झळकत आहे. या योजनेला जिल्ह्यात महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यांच्यात आनंदाचे वातारण निर्माण होत आहे. या योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे. माता-भगीनींसाठी ही योजना चांगलीच लाभाची ठरत असून सदर योजना सुरुच राहणार आहे.

       मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत माझ्या बँक खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झाले, याचा खूप आनंद झाला. खरं तर भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देतो. मात्र मुख्यमंत्र्यांनी राखी बांधण्यापूर्वीच बहिणीला ओवाळणी दिली, त्यामुळे आम्हा बहिणींना खूप आनंद झाला असून या योजनेसाठी मुख्यमंत्री व शासनाला खूप खूप धन्यवाद.
-ज्योती  डोंगरे, गोंदिया

        मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत माझ्या बँक खात्यात १४ ऑगस्टला तीन हजार रुपये जमा झाले. ही खूप आनंदाची बाब असून शासनाने आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू केलेली ही योजना महिलांना आत्मनिर्भर करणारीच आहे. यासाठी आम्ही शासनाचे आभारी आहोत. 
-दुर्गा सेलोकार, गोंदिया
        
         मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मला मिळाले आहेत. माझी आर्थिक स्थिती बेताची असल्याने मुलीची फी भरायची अडचण होती. अशातच योजनेचा लाभ मिळाल्याने ही अडचण आता दूर झाली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सरकारचे खूप खूप आभार. 
-तृप्ती  डोंगरे, बलमाटोला, गोंदिया